गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

लॉकडाऊनच्या काळात मोफत गॅस सिलेंडरमुळे झाली मोठी मदत लाभार्थ्यांनी मानले आभार

प्रधानमंत्री उज्वला योजनेचा जिल्ह्यातील ५२ हजार ६७९ लाभार्थ्यांना लाभ

सांगली (जि.मा.का) 23 : कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत सिलेंडर देण्यात येत आहे. संचारबंदीतील परिस्थितीला आर्थिक झळ कमी बसावी म्हणून शासनाने प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 1 एप्रिल ते 30 जून 2020 या तीन महिन्याच्या कालावधीत मोफत एलपीजी गॅस सिंलेडर देण्याची तरतूद केली आहे. या योजनेचे जिल्ह्यात 1 लाख 11 हजार 177 लाभार्थी असून 1 एप्रिल पासून आजअखेर 52 हजार 679 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
या योजनेचा लाभ घेतलेल्या नविन रेल्वे स्टेशन रोड, सांगली येथील सारिका सुहास माने म्हणाल्या, आमचे कुटुंब 6 जणांचे असून आमच्या घरातील पुरुष गवंडी काम करीत असून कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आमची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत 730 रूपये इतकी रक्कम सासुंच्या नावे जमा झाली असून त्यातून आम्ही गॅस घेतला आहे. त्यामुळे शासनाचे खुप खुप आभारी आहे. 
याच भागातील शोभा आण्णा पवार म्हणाल्या, लॉकडाऊनमुळे आमची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत 730 रूपये इतकी रक्कम जमा झाली असून त्यातून मी गॅस घेतला आहे.
या योजनेंतर्गत उज्वला ग्राहकांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याच्या 14.2 किलो रिफिलच्या किंमतीएवढे (RSP) समान रक्कमेची आगाऊ रक्कम जमा करण्यात येते. 14.2 किलो च्या महिन्याला 1 असे 3 महिन्यात 3 रिफीलची तरतूद आहे.  ज्या उज्वला ग्राहकांकडे 5 किलोचे सिलेंडर आहे त्यांना महिन्याला 3 तर योजनेच्या अवधीमध्ये फक्त  8 रिफिलची तरतूद आहे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी त्यांना प्राप्त झालेल्या रक्कमेतून सिलेंडर घेतला नाही तर त्यांना पुढील महिन्यात आगाऊ रक्कम मिळणार नाही. आगाऊ रक्कम मिळण्यासाठी ग्राहकांने त्यांचे बँक खाते चालू असण्याबाबत खात्री करणे आवश्यक आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांना आगाऊ रक्कम मिळाली नाही त्यांनी गॅस वितरकांशी संपर्क साधावा किंवा ऑइल कंपनीच्या हेल्पलाईन - एच पी गॅस/ इंडेन गॅस  18002333555, भारत गॅस 1800224344 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आधार लिंक न झाल्याबाबतची कारणे जाणून घेवून त्या बाबत आपल्या बँकेत जावून सुधारणा करून घ्यावी.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा