गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ढालगाव येथे १ लाख ९० हजाराहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त - अधीक्षक किर्ती शेडगे

सांगली, दि. २३, (जि. मा. का.) : कोरोना विषाणूचा संसर्ग प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे संचारबंदी आदेश लागू केले आहेत. मुंबई दारूबंदी कायदा १९४९ अन्वये मंजूर असणाऱ्या सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सांगली जिल्ह्यात  दि. २२ एप्रिल रोजी कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे छापे टाकून एकूण ९ गुन्हे नोंद करून १ आरोपीस अटक करण्यात आली. तसेच १ लाख ९० हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  या कारवाईमध्ये ८७ ब. लि. हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे व ८०९० ब.लि. रसायन नाश करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क सांगली च्या अधीक्षक किर्ती शेडगे यांनी दिली.
ही कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली, मिरज, विटा व भरारी पथक तसेच दु. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली, मिरज, जत, विटा, तासगाव व भरारी पथक व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कर्मचारी वर्ग यांनी केलेली आहे.
लॉकडाऊन परिस्थितीचा फायदा घेऊन शहरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध तसेच भेसळयुक्त मद्यविक्री, हातभट्टी विक्री तसेच मद्याचा काळा बाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा मद्याच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यास अपाय हानी होऊ शकते. नागरिकांनी अशा प्रकारच्या मद्याची खरेदी अथवा सेवन करू नये. तसेच अशा मद्याची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्वरीत राज्य उत्पादन शुल्क विभागास माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक किर्ती शेडगे यांनी केले आहे.
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा