रविवार, १० मे, २०२०

सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करून व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : सर्वांच्या सहकार्यामुळे कोरोना संसर्गाबाबत सांगली जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. जरी जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असला तरी ही स्थिती बदलत राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याबाबत काळजी घेणे अत्यावश्यक आहे. देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता कोराना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही तेथे कडक कारवाई केली जाईल, असे सांगून व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी संदिपसिंह गिल, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांच्यासह विविध व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्हा प्रशासनामार्फत विविध बाबींवर घालण्यात आलेले निर्बंध हे शासनाच्या आदेशानुसारच घालण्यात आलेले असून त्याप्रमाणेच कारवाई केली जात आहे. कोणतेही अधिकचे निर्बंध जिल्हा प्रशासनामार्फत घालण्यात आलेले नाहीत. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासन यांच्या समन्वयानेच सर्व निर्णय घेण्यात येत आहेत. लॉकडाऊनची मुदत 17 मे पर्यंत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आतापर्यंत जसे सहकार्य केले आहे त्याप्रमाणेच पुढील लॉकडाऊन कालावधीत सहकार्य करावे. सर्वसामान्य जनतेचे आरोग्य सुरक्षित रहावे याचा सरासरी विचार करून निर्णय घ्यावे लागतात.  17 मे नंतर शासनाच्या अधिकच्या सूचना येतील त्यानुसार विविध बाबी कशा प्रकारे सुरू करता येतील याचा विचार केला जाईल. त्यासाठी व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायानुसार ॲडव्हायझरी तयार करावी. याबाबत 15 किंवा 16 मे रोजी पुन्हा व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येईल, असे सांगितले.
परराज्यातून अन्य जिल्ह्यातून लोक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहेत याबाबत अधिक दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, दुकानदारांनी स्वयंशिस्त पाळण्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंग काटेकोर पाळण्याच्या अनुषंगाने दुकानाबाहेर मार्किंग करून त्यानुसार व्यवहार करावेत गर्दी टाळावी, असे आवाहन केले.
यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांचे उद्योगधंदे नजिकच्या कोल्हापूर जिल्ह्यात असल्यामुळे ते सुरू करण्यासाठी त्यांना दररोज                  येण्याजाण्यासाठी पास मिळावा अशी विनंती केली. यावर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हाबंदी असल्यामुळे असे दररोज येण्याजाण्यासाठी पास देता येणार नसल्याचे सांगून उद्योग सुरू करण्यासाठी एकवेळचा जाण्यासाठी पास देता येईल, असे सांगितले. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्या विविध समस्या मांडल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, जिल्हा प्रशासन जे निर्णय घेईल त्याला सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन महानगरपालिका प्रशासन यांच्याकडून करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची प्रशंसा केली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी कोरोनाचा प्रसार होऊ नये याबाबत मौलिक सूचना दिल्या प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी गेल्या 8 दिवसात 4 हजार 500 व्यक्ती बाहेरील राज्यातून अन्य जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात आल्याचे सांगितले यापुढेही मोठ्या प्रमाणात लोक येतील असे सांगितले.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा