बुधवार, १० जून, २०२०

उद्योग घटकांमधील मनुष्यबळाची कमतरता तात्काळ दूर करण्यासाठी आयटीआय, कौशल्य प्रशिक्षण संस्थामधून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती द्या - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील उद्योग घटकांना आवश्यक कौशल्य असणारे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक आयटीआय मध्ये सुधारणा करणे आवश्यक असून त्यासाठी चांगले गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण भागीदार शोधून प्रशिक्षण द्यावे. उद्योग घटकांच्या गरजेनुसार आवश्यक कोर्स डीपीडीसीच्या निधीमधून सुरू करावे. ऑन जॉब ट्रेनिंग अनिवार्य करावे. ज्या उद्योग घटकामध्ये नवीन कामगार आहेत त्यांना मुलभूत कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आयटीआयने पुढाकार घ्यावा. उद्योग घटकांमधील मनुष्यबळाची कमतरता तात्काळ दूर करण्यासाठी आयटीआय कौशल्य प्रशिक्षण संस्थामधून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन ती संबंधितांना उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
कौशल्य विकास जिल्हा कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त एस. के. माळी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, आयटीआय चे प्राचार्य यतीन पारगावकर यांच्यासह कौशल्य प्रशिक्षण संस्थाचे व्यवस्थापक, औद्योगीक संघटनाचे प्रतिनिधी आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सर्व उद्योजकांनी कौशल्य विकास विभागाच्या वेबसाईटवर कर्मचारी नोंदणी करावी. त्याचबरोबर उमेदवार नोंदणीही करणे आवश्यक आहे. ज्या उद्योग घटकांमध्ये दिवस-रात्र उत्पादन सुरू आहे, अशा उद्योग घटकांतील सांगली जिल्ह्यातील कामगारांना संचारबंदी कालावधीत ये-जा करण्यासाठी पास उपलब्ध करून देण्यात येतील. ही सोय फक्त एकाच पाळीतील कामगारांसाठी देण्यात येईल. त्यासाठी संबंधित उद्योग घटकांनी कामगारांची यादी द्यावी, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
बैठकीत कोविड-19 विषाणूमुळे उद्भवलेल्या जागतिक संकटामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये मनुष्यबळ कमतरता उपाय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सहाय्यक आयुक्त एस. के. माळी यांनी कौशल्य विकासा कृती आराखडा सन 2020-21 चे सादरीकरण केले कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या सद्यस्थितीतील कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा