सोमवार, १५ जून, २०२०

सांगली जिल्ह्यात कोरोना अनुषांगिक उपाययोजनांची अंमलबजावणी समाधानकारक - वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख


सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : कोविड-19 संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या उपाययोजना राज्यभर सुरू आहेत. सांगली जिल्ह्यात या योजनांची अंमलबजावणी अतिशय समाधानकारक आहे, असे प्रतिपादन वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 च्या अनुषंगाने सांगली शहर आणि जिल्ह्यातील एकंदर स्थितीचा आढावा वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी घेतला. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. सुधीर नणंदकर, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळाची गरज ओळखून जिल्ह्यातील आरोग्य विषयक सुविधा अद्ययावत करण्यात याव्यात, असे सांगून वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले, कोरोना व्यतिरीक्त इतर रूग्णांना उपचारात अडचण निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. प्रत्येक रूग्णालयाने वैद्यकीय संरक्षक सामग्री रूग्णालयामध्ये उपलब्ध ठेवणे बंधनकारक आहे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले, कोविड-19 ही जागतिक आपत्ती असून या विरूध्द सर्वच पातळीवर जगभर लढा सुरू आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अगदी सुरूवातीपासूनच नियंत्रणात ठेवण्यात आला आहे. अगदी सुरूवातीला जिल्ह्यात पदरेशातून आलेले काही प्रवासी कोरोना पॉझीटीव्ह आढळल्याने तारांबळ उढाली होती. तथापी, जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम आणि प्रशासन यांनी अत्यंत तत्परतेने कंटेनमेंट झोन आणि अन्य अनुषांगिक उपाययोजना अत्यंत काटेकोरपणे केल्याने प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परजिल्ह्यातील, परराज्यातील लोक स्वजिल्ह्यात परतल्याने नंतरच्या काळात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला पण स्थिती नियंत्रणात आहे.
महाराष्ट्रातील कोरोना बाधीतांचा आकडा अन्य राज्याच्या तुलनेत जास्त असला तरी महाराष्ट्राचे परदेशातील एक्सपोजर जास्त आहे. महाराष्ट्र शासनाने अत्यंत काळजीपूर्वक धाडसी निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील कोरोना विरूध्दचा लढा तीव्र आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सामग्री ऑक्सीजन, व्हेंटीलेटर, पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोविड-19 चे उपचार मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सांगली जिल्ह्यात मृत्यूदर, रूग्णदर कमी आहे. तसेच रूग्ण दुपटीचा दर पंधरावड्याच्या पुढे गेला आहे. या ठिकाणी सर्व आवश्यक वैद्यकीय सामग्री, औषधे, पर्यायी औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कोमॉर्बीडीटीमुळे रूग्ण दगावतात हे टाळण्यासाठी अशा रूग्णांची माहिती संकलीत करण्यात येत आहे. प्लाझ्मा थेरपीची उपचार अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आले आहेत. प्लाझ्मा बँकही सुरू करण्यात येणार आहे. सरकारी रूग्णांलयामध्ये, प्रयोगशाळांमध्ये अनुषांगिक चाचणी मोफत करण्यात येतेच पण खाजगी प्रयोगशाळेमधील चाचणीचे दरही निर्धारीत करण्यात आले आहेत, असे सांगून वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले, आवश्यकतेनुसार खाजगी रूग्णांलयामधील बेडही कोविड-19 च्या उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. या बैठकीत इन्स्टीट्युशनल क्वारंटाईनमध्ये असलेल्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, 50 वर्षावरील लोकांची वैद्यकीय तपासणी मोहिम, मास्क, सॅनिटायझर यांची जिल्ह्यातील उपलब्धतता यांचा सविस्तर आढावा घेऊन कोमॉर्बीडीटी असणाऱ्या रूग्णाचे योग्य व्यवस्थापन करावे, असे निर्देश वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनची ठिकाणे सिव्हील हॉस्पीटलशी जोडण्यात यावीत. तेथील नागरिकांना सर्व आरोग्य विषयक सुविधा देण्यात येऊन त्यांना मानसिक आधार देण्यात यावा. तसेच कोविड-19 चे रूग्ण रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत त्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी व्हीडीओ कॉन्फरन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. संभाव्य महापूराच्या स्थितीत कोरोनाची तीव्रता वाढल्यास स्थिती हाताळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मंत्रीमंडळात चर्चा होणे आवश्यक असल्याचे सांगून पूरपट्ट्यातील गावांमध्ये आरोग्य यंत्रणेचे पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध असणे आवश्यक असल्याचीही मागणी यावेळी त्यांनी केली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी जिल्ह्यातील कोरोनाच्या अनुषंगाने माहिती देत असताना सद्यस्थितीत ग्रामीण भागात 70, शहरी भागात 7 व महानगरपालिका क्षेत्रात 2 कंटेनमेंट झोन सुरू असून आजअखेर जिल्ह्यात 247 लोकांना कोरोनाची लागण झाली होती यातील 125 रूग्ण बरे झाले आहेत. 114 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 8 रूग्ण मयत झाले आहेत, असे सांगितले. जिल्ह्यातील 5 हजार 866 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत 13 ठिकाणी असणाऱ्या संस्था अलगीकरणांमध्ये 476 व्यक्ती तर गृह अलगीकरणामध्ये 176 व्यक्ती आहेत, असे सांगून संभाव्य रूग्णस्थितीत वाढ झाल्यास त्रिस्तरीय उपचार पध्दती कार्यान्वीत करण्याची कार्यवाही आवश्यकतेनुसार सुरू असून 38 ठिकाणी कोविड केअर सेंटर, 49 ठिकाणी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व 4 जिल्हास्तरीय कोविड हॉस्पीटल यांचा समावेश आहे, अशी माहिती दिली. यावेळी त्यांनी 50 वर्षावरील व्यक्तींच्या आरोग्य तपासणी मोहिमेची माहिती दिली.
00000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा