मंगळवार, १६ जून, २०२०

खाजगी व सार्वजनिक आस्थापनांनी बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात - सहाय्यक आयुक्त संजय माळी


नोकरी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलवर नाव नोंदणी करावी

सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कामगार, कर्मचारी जिल्ह्यातून बाहेर गेल्यामुळे उद्योजकांना मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. जिल्ह्यातील खाजगी व सार्वजनिक आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या http://mahaswayam.gov.in या वेबपोर्टलचा लाभ घेऊन बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपली नाव नोंदणी सदर वेबसाईटवर करावी. ज्यांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे त्यांनी आधार लिंकसह नोंदणी अद्ययावत करावी व उपलब्ध नोकरीच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही तांत्रिक कारणास्तव बेरोजगार झालेल्या व नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांना नोकरीची गरज आहे, अशा उमेदवारांच्या सेवा घेण्यासाठी खाजगी व सार्वजनिक आस्थापनांनी सदर वेबपोर्टलचा लाभ घ्यावा. यासाठी http://mahaswayam.gov.in या वेबसाईटव्दारे सेवा सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये रिक्तपदे अधिसूचित करणे, बेरोजगार उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कुशल मनुष्यबळ माहितीची उपलब्धता, रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमातून रिक्तपदे अधिसूचित करणे, मनुष्यबळ माहिती नोंदणीबाबत सुविधा (ईआर-१) हे सर्व सदर संकेतस्थळावर उपलब्ध आहे. बेरोजगार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, नाव, पत्ता, ई-मेल, मोबाईल नंबर ही माहिती संबंधितांना प्राप्त होऊ शकते. संबंधित आस्थापनेतील रिक्त पदांची नोंदणी वेबपोर्टलवर प्राप्त युजर आयडी व पासवर्डचा वापर करून माहिती डाऊनलोड करू शकतात. तसेच प्रत्येक ई-आर-१ ची सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीनंतरच्या महिन्यात १ ते ३० तारखेपर्यंत भरण्याची दक्षता घ्यावी.
कौशल्य विकास विभागाच्या वेबसाईटचा उपयोग करून जास्तीत जास्त युवक / युवतींनी रोजगाराच्या संधीचा फायदा घ्यावा. तसेच उद्योजकांनी जिल्ह्यातील उपलब्ध मनुष्यबळाचा उपयोग वेबसाईटव्दारे करून घ्यावा. याबाबत काही अडचणी असल्यास 0233-2600554 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा