बुधवार, १० जून, २०२०

लॉकडाऊनमध्ये नागरिकांना विविध अत्यावश्यक सेवा देण्यात सांगली डाक विभाग राज्यात अव्वल - प्रवर अधीक्षक ए. आर. खोराटे

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात 419 शाखांचे जाळे असलेल्या डाक विभागाने लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना मेडिकल पार्सल्सची पोहोच, मनी ऑर्डर्स, AePS च्या माध्यमातून इतर बँकेतील खात्यामधून घरपोच पैसे काढण्याची सुविधा, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची नवीन बँक खाती, पैसे ट्रान्सफर, विविध शासकीय आस्थापनांची बिल पेमेंट इत्यादी सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोच केल्या. जिल्ह्यात याचा लाभ आत्तापर्यंत साधारणपणे 57 हजार कुटूंबांनी घेतला असून याव्दारे जवळपास 8 कोटी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. देशभरात पोस्ट विभागाने केलेल्या या कामाची दखल प्रधानमंत्री कार्यालय तसेच नीती आयोगाव्दारे घेण्यात आली. या कामगिरीमध्ये सांगली पोस्ट विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये अव्वल ठरला आहे. अशी माहिती सांगली डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक ए. आर. खोराटे यांनी दिली.
श्री. खोराटे म्हणाले, लॉकडाऊन काळामध्ये केंद्र शासनाने पोस्ट विभागाला अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केले. खेडोपाडी असलेल्या जाळ्यामार्फत पोस्ट विभागाने विविध प्रकारच्या अत्यावश्यक सेवा नागरिकांना घरपोच दिल्या. याकामी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले. पोस्ट विभागाने साधारणत: 15 हजार अत्यावश्यक मेडिकल पार्सल्स गरजूना पोहोच केल्या. सार्वजनिक वाहतूक बंद असतानाही विशेष टपाल गाडीचे नियेजन करून जिल्हांतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील टपाल यंत्रणा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. आर्थिक दुर्बल घटकांना केंद्र शासनामार्फत विविध योजनांतर्गत पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले. लॉकडाऊनमुळे हे पैसे बँक किंवा एटीएम मध्ये जाऊन काढण्यास अनेक अडचणी येत होत्या. पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंटस् बँकेच्या AePS  सुविधेव्दारे लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यातील रक्कम काढण्याची सुविधा पोस्टमन मार्फत घरपोच देण्यात आली.
ज्या लाभार्थ्यांचे बँकेमध्ये खाते नव्हते अशा सुमारे 8 हजार लाभार्थ्यांचे खाते पोस्ट विभागात आणि सुमारे 17 हजार लाभार्थ्यांचे खाते इंडिया पोस्ट पेमेंटस् बँकेमार्फत उघडण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात संपूर्ण सांगली पोस्टल डिव्हिजनमध्ये पोस्टल बचत खात्यामार्फत 273 कोटी रूपये, पेन्शन खात्यावरून 5 कोटी 90 लाख रूपये आणि इंडिया पेमेंटस् बँकेच्या बचत खात्यावरून 9 कोटी 20 लाख रूपये रक्कमेचे व्यवहार करण्यात आले. हे करत असतानाच कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर आणि हातमोजे पुरविण्यात आले. तसेच त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढावी यासाठी आयुष मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शिकेनुसार आर्सेनिक 30 अल्बम या होमिओपॅथिक औषधांचा पुरवठा करण्यात आला. शिवाय 97 गरजूंना अन्न-धान्याची / दैनंदिन गरजेच्या वस्तूंची पाकीटे तसेच 52 विस्थापित कामगारांना जेवण देण्यात आले. याप्रकारे लॉकडाऊनमध्ये ग्राहकांची तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत व समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना सेवाभावी वृत्तीने मदत करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून सामाजिक बांधिलकीही जपण्याचा प्रयत्न सांगली डाक विभागाकडून करण्यात आल्याचे, प्रवर अधीक्षक ए. आर. खोराटे यांनी सांगितले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा