शनिवार, २० जून, २०२०

शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्जाचा पुरवठा करावा - सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सहकार व पणन विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा बैठकीदरम्यान घेतला. सांगली जिल्ह्यामध्ये सर्वत्र पर्जन्यवृष्टी झालेली असून पेरणीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. अशावेळी शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी पीक कर्जाची आवश्यकता भासत असल्याने, तालुकानिहाय व बँकनिहाय पीक कर्जवाटपाचा सविस्तर आढावा सभेमध्ये घेतला तसेच जे शेतकरी पीक कर्ज घेण्यासाठी पात्र आहे त्यांना तातडीने बँकांनी पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना सभेमध्ये देण्यात आल्या. तसेच जून अखेर प्रत्येक बँकेने त्यांच्या उद्दिष्टाचे किमान ६० टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात यावे असेही सूचित केले.

सन २०१९ मधील जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या पूरपरिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांचे पीक बाधित झालेले आहे अशा पिकांसाठी घेतलेल्या कर्जाची एक हेक्टर पर्यंतची कर्ज माफीचे प्रस्ताव तातडीने अंतिम करून अतिरिक्त लागणाऱ्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात यावी. जेणेकरून उर्वरीत शेतकऱ्यांना तातडीने लाभ मिळवून देता येईल अशा सूचना सभेमध्ये देण्यात आल्या.
सांगली जिल्ह्यामध्ये आर्थिक अडचणीमध्ये आलेल्या नागरी सहकारी बँकांचा सविस्तर आढावा घेऊन अवसायकाने कर्जवसुलीसाठी विहित कालमर्यादेमध्ये प्रयत्न करावेत व ठेवीदारांच्या ठेवीच्या रकमा तातडीने परत करण्यात याव्यात अशा सक्त सूचना सभेमध्ये देण्यात आल्या.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतऱ्यांच्या हिताचे निर्णय अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होते आहे किंवा कसे याबाबत तालुका पातळीवर सहाय्यक निबंधक यांनी वेळोवेळी बाजार समितीस भेट देऊन संचालक मंडळाच्या प्रत्येक सभेमध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. यासोबतच इतर अनेक विषयांचा आढावा घेतला.
या सभेसाठी मा. सहकार मंत्र्यांचे खासगी सचिव संतोष पाटील, जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरण पाटील, सांगली जिल्ह्यातील सहकार विभागातील सर्व अधिकारी व नागरी सहकारी बँकांचे प्रशासक, अवसायक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा