बुधवार, १७ जून, २०२०

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोगस डॉक्टरांबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 17, (जि. मा. का.) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपचारासंदर्भात कोणी चुकीची माहिती    पसरवित असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगून बोगस डॉक्टरांबाबत मोठ्या      प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तालुकास्तरीय पुनर्विलोकन   समित्यांनी 15 दिवसात द्यावा. यामध्ये कोणतीही हजगर्जी करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.      अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस प्र. पोलीस उपअधिक्षक शिवाजी गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. अरविंद देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, ग्राहक संघटनेचे डॉ. ज्ञानचंद्र पाटील, सुरेश भोसले आदि उपस्थित होते.
                                कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमे, सामाजिक माध्यमे यामधून उपचारासंदर्भात दिशाभूल    करणारी चुकीची माहिती पसरविली जाऊ नये यासाठी सर्व यंत्रणा व तालुकास्तरीय समिती यांनी अधिक      सक्षम व डोळस होण्याची गरज जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केली. म्हैसाळ स्त्री भृण     हत्या प्रकरणामध्ये तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तात्काळ गुन्हा नोंद करावा. यामध्ये विलंब झाल्यास    संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलीस विभागाने संशयास्पद वाटणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांची यादी गावनिहाय तयार करावी व संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांना द्यावी.    बोगस डॉक्टरांकडून अनेकदा विविध आजारांच्या उपचाराबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती देण्यात येतात. अशावेळी डमी पेशंट पाठवून शहानिशा करावी व कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
          या बैठकीत बोगस डॉक्टरांबाबत जनजागृती, म्हैसाळ स्त्री भृण हत्या प्रकरण, उपचारांबाबत    दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, बोगस डॉक्टरांवर कारवाई करिता धडक मोहिमा आदिच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा