सोमवार, १५ जून, २०२०

फळपिक विमा योजनेचा विहीत मुदतीत विमा हप्ता भरून लाभ घ्या - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी

विमा हप्ता भरण्याची पेरू व लिंबू पिकांकरिता २४ जून तर डाळिंब पिकासाठी १४ जुलै अंतिम मुदत

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत जिल्ह्यात पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना (मृग बहार) सन 2020-21 मध्ये डाळींब, पेरू व लिंबू या फळपिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळांना लागू करण्यास शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यात आली आहे. बिगर कर्जदार, कर्जदार शेतकऱ्यांकरीता विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत पेरू व लिंबू पिकांकरिता २४ जून २०२० आणि डाळींब पिकासाठी १४ जुलै २०२० अशी निर्धारित करण्यात आली आहे. पेरू, लिंबू व डाळिंब फळपिक उत्पादक शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत विमा हप्ता भरून या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक आहे. अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी, एका वर्षात, एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता शेतकऱ्यांना विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल (उदा. डाळींब). केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण लागू आहे. सांगली जिल्ह्यामध्ये ही योजना अधिसूचित महसूल मंडळामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यत येत असल्याचे श्री. मास्तोळी यांनी सांगितले.
सदर फळपिकासाठी प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम व कंसात शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता पुढीलप्रमाणे आहे. पेरू - 60 हजार रूपये (३ हजार रूपये), लिंबू – 70 हजार रूपये (३ हजार ५०० रूपये), डाळींब – १ लाख ३० हजार रूपये (६ हजार ५०० रूपये).
ऐच्छिक सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचे प्रस्ताव पत्रक भरून रोख विमा हप्त्यासह आपले खाते असणाऱ्या बँक शाखेत विहीत मुदतीत जमा करावे. किंवा आपले सरकार सेवा केंद्र, विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्याशी संपर्क करून सहभाग नोंदवावा. अथवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वत: सहभाग नोंदविण्याची सुविधा आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. मास्तोळी यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा