मंगळवार, २ जून, २०२०

लॉकडाऊनच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश जारी

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाने 30 जून 2020 पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे त्याअनुषंगाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी शासन निर्देशानुसार दिनांक 1 जून 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 30 जून 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार सांगली जिल्ह्याच्या सीमा, बंदी आदेशाच्या कालावधीत बंद राहतील या कालावधीत आंतरराज्य आंतरजिल्हा माल वाहतूक, जिवनावश्यक सेवा / सुविधा अत्यावश्यक सेवांसाठी होणारी वाहतूक जिल्हा अंतर्गत सशर्त प्रवासी वाहतूक वगळून उर्वरित सर्व वाहतूक प्रतिबंधीत असेल. आंतरराज्य आंतरजिल्हा व्यक्तीच्या प्रवासावर प्रतिबंध असेल असा प्रवास मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियंत्रित केला जाईल. सदर कालावधीत 21.00 वाजल्यापासून ते 05.00 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा, कॉलेज, शैक्षणिक / प्रशिक्षण / शिकवणी देणाऱ्या संस्था इत्यादी प्रतिबंधित असतील. चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्कस (entertainment), प्रेक्षागृहे, बार आणि सभागृहे, असेंब्ली हॉल यासारखे तत्सम सर्व ठिकाणे प्रतिबंधित असतील. सर्व सामाजिक / राजकीय / क्रीडा / करमणूक / शैक्षणिक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मेळावे प्रतिबंधित असतील. धार्मिक स्थळे सार्वजनिक ठिकाणाची उपासनास्थळे प्रतिबंधित असतील. केश कर्तनालये, स्पा, सलूनस, ब्युटी पार्लर्स प्रतिबंधित असतील.
शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा प्रतिबंधित असतील. हॉटेल्स, रेस्टॉरंट किचन येथून पार्सल देणे घरपोच सेवा संचारबंदी कालावधी वगळता अनुज्ञेय असेल. जिल्ह्यातील वय वर्षे 65 वरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, 10 वर्षाखालील बालके आजार असणाऱ्या व्यक्ती (persons with co-morbidities) यांना अत्यावश्यक गरजा वैद्यकीय सेवा वगळता घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. सदर कालावधीत अंत्यविधीकरीता 20 लग्नसमारंभ करिता 50 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. शासन निर्देशाप्रमाणे सदर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक राहणार आहे. अत्यावश्यक सेवा जीवनावश्यक वस्तू वगळून सर्व मार्केट दुकाने 09.00 पूर्वी 17.00 वाजल्यानंतर चालू ठेवता येणार नाहीत. एखाद्या ठिकाणी गर्दी होेवून सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ मार्केट दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात येतील. सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा, तंबाखू, सुपारी खाणे थुंकणे प्रतिबंधित असेल. तसेच सदर बाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. 15 मे 2020 च्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) या क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात आली आहे. वैद्यकीय  कारण आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रात लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णत: प्रतिबंध करण्यात आला आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेतील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. क्रीडा संकुले किंवा स्टेडीयमच्या आतील क्षेत्र (बंदिस्त) याचा वापर प्रतिबंधित असेल. मास्क बाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. 13 एप्रिल 2020 च्या आदेशानुसार तंतोतंत कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासन, महसूल वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, मंत्रालय यांच्याकडील दि. 31 मे 2020 रोजीच्या आदेशाच्या कलम 8 मध्ये नमूद नसलेल्या सर्व बाबी आणि ज्या प्रतिबंधित किंवा बंदी घातलेल्या नसतील त्या सर्व बाबी प्रतिबंधित नसलेल्या क्षेत्रामध्ये पुढील अटीच्या आधारे सुरू असण्यास परवानगी असेल. यानुसार परवानगी असलेल्या बाबीना कोणत्याही शासकीय परवानगीची आवश्यकता नाही. क्रीडा संकुले आणि मैदाने यांच्या बाह्य जागा आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागा या वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहतील. परंतु प्रेक्षक जमल्यास समुह सराव किंवा खेळ खेळण्यास परवानगी दिली जाणार नाही. सर्व शारीरिक व्यायाम आणि इतर व्यायाम प्रकार सामाजिक अंतराचे निकष पाळून करण्यास हरकत नाही.
सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक यांना पुढीलप्रमाणे प्रवासी संख्येच्या हमीसह वाहतूक व्यवस्थापन करता येईल. परंतु प्रत्येक वापराच्या वेळी असे वाहन निर्जंतुकीकरण करणे, प्रवासी चालक / वाहक यांनी मास्क वापरणे बंधनकारक असेल. चालकाने त्यांच्या वाहनात निर्जंतुकीकरण उपकरण ठेवणे बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे मास्क घातलेल्या प्रवाशांना वाहनात प्रवेश देता येणार नाही. दुचाकी  1 स्वार, तीन चाकी  1 + 2, चार चाकी  1 + 2. जिल्हा अंतर्गत बस सेवा ही जास्तीत जास्त 50 टक्के प्रवासी क्षमतेसह त्याचबरोबर बसमध्ये शारीरिक अंतर आणि स्वच्छता विषयक उपाययोजनेसह सुरू करता येईल. प्रत्येक बस प्रत्येक वापरानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावी लागेल. त्याचप्रमाणे मास्क परिधान केलेल्या प्रवाशांना वाहनात प्रवेश देता येणार नाही. वाहनात बसताना सॅनीटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल. आंतर जिल्हा बस सेवेबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील.
वरील प्रतिबंधित बाबी वगळता उर्वरित सर्व बाबींना मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, महसूल वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, मंत्रालय यांच्याकडील दि. 31 मे 2020 रोजीच्या आदेशामध्ये नमूद प्रतिबंध सुट लागू असेल. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, इंसिडन्ट कमांडर तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरूध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाव्दारे प्राधिकृत करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.
00000






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा