मंगळवार, २ जून, २०२०

कोरोनाची लक्षणे दिसल्यास रूग्णालयात त्वरीत उपचार घ्या - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : लक्षणे दिसू लागताच त्वरीत उपचार घेतल्याने कोरोना 100 टक्के बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी सर्दी, पडसे, खोकला, वास येणे, चव येणे, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास रूग्णालयात येऊन त्वरीत उपचार घ्यावेत. वेळेत उपचार सुरू झाल्यास चिंताजनक स्थिती, मृत्यूचा धोका टाळणे शक्य आहे. ज्या व्यक्ती अन्य जिल्ह्यातून तसेच कोरानोच्या हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणाहून आल्या आहेत अशा व्यक्तींनी, अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांनी तसेच ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असे आजार आहेत अशांनी त्रास जाणवू लागताच तात्काळ फिवर क्लिनीक मध्ये येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
कोरोनाची स्थिती लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या शिथीलता या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज माध्यमांना माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी उपस्थित होते.
प्लाझ्मा थेरेपी जिल्ह्यात सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असून पुढील आठवड्यात आवश्यक परवानगी मिळेल जिल्ह्यात  प्लाझ्मा थेरेपी उपचार कोरोना बाधीत रूग्णावर सुरू होतील, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, त्या दृष्टीने कोरोना मुक्त झालेल्या रूग्णांचे रक्त संकलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यात कोरोना बाधीतांवर उपचारासाठी मिरज सिव्हील हॉस्पीटल, वॉलनेस हॉस्पीटल, भारती हॉस्पीटल इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पीटल येथे कक्ष तयार करण्यात आले असून संभाव्य रूग्ण वाढल्यास उपचारासाठी 10 हजार बेडची क्षमता निर्माण केली आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या 1 ते 30 जून या कालावधीसाठी गाईडलाईन्स आल्या असून यामध्ये रात्रीच्या संचारबंदीचा कालावधी आता रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत करण्यात आला आहे. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती (मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आदि), 10 वर्षाखालील मुले, गरोदर महिला यांनी वैद्यकीय कारणाव्यतीरिक्त घराबाहेर पडू नये. कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा, वस्तू, वैद्यकीय निकड याबाबतचे नियम पूर्वीप्रमाणेच राहतील.
 शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस यापुढेही पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहतील. ऑनलाईन शिक्षण सुरू राहील. आंतरराष्ट्रीय प्रवासाहून आलेल्या प्रवाशांना 14 दिवस इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन व्हावे लागेल. त्यांना स्वखर्चाने हॉटेल्समध्ये रहाता येईल. शक्य नसल्यास शासनाने सुविधा केलेल्या इमारतीमध्ये इन्स्टिट्युशन क्वारंटाईन व्हावे लागेल. विशेष रेल्वेचा वापर करून जिल्ह्यात येणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. ज्यांना लक्षणे नसतील त्यांना होमक्वारंटाईन करण्यात येईल. ज्यांना लक्षणे असतील त्यांना हॉस्पीटलमध्ये उपचाराखाली ठेवण्यात येईल. सिनेमा हॉल, जिमनॅशियम, स्वीमिंग पूल, असेंम्बली हॉल, मनोरंजनाचे पार्क, थिएटर, बार, ऑडोटोरियम, एकत्र जमण्याचा जागा बंद राहतील. सामाजिक, राजकीय, क्रीडा मनोरंजनात्मक, सांस्कृतिक, धार्मिक, गर्दी जमावणारे कार्यक्रम घेता येणार नाहीत. धार्मिक स्थळे सर्वसाधारण लोकांसाठी बंदच राहतील. सलून, स्पा, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर या आदेशानुसार तुर्तास बंद राहतील. शॉपींग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टारंट अन्य आदरातिथ्य सेवा बंद राहतील. तथापी पार्सल सेवा घरपोच सेवा संचारबंदी कालावधी वगळता सुरू ठेवता येईल.
आंतरराज्य, आंतरजिल्हा लोकांच्या प्रवासासाठी पास सिस्टीम सुरू राहील. ही सुविधा कामगार, अडकून पडलेले नागरिक, तीर्थयात्री, यात्रेकरू यांच्यासाठी ही सुविधा असणार आहे. आंतरराज्य आंतरजिल्हा बॉर्डर वरील हालचाल नियंत्रित असणार आहे. आंतरराज्य आंतरजिल्हा फुडस वाहतूक पूर्वीप्रमाणेच असणार आहे. त्यामधे कोणताही बदल केलेला नाही. डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ,           सॅनिटायझेन स्टाफ, ॲम्बुलन्स यांच्या मुव्हमेंटवर प्रतिबंध असणार नाही. आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड केल्यामुळे स्वत:चे, परिवारातील व्यक्तींचे आपल्या नजीकच्या संपर्कातील लोकांचे संरक्षण होऊ शकते. त्यामुळे हे ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनामार्फतही आवाहन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य असून लग्नसमारंभासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून जास्तीत जास्त 50 व्यक्ती तर अंत्यविधीसाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून जास्तीत जास्त 20 व्यक्ती असू शकतील. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे कायदेशीर गुन्हा असून असून त्यासाठी किमान 500 रूपये दंड असणार आहे. दारू, पान, तंबाखू यांचे सार्वजनिक ठिकाणी सेवन करण्यास बंदी आहे. खाजगी आस्थापनामध्ये वर्क फ्रॉम होमला उत्तेजन. क्रीडा संकुले, मैदाने, खुल्या जागा, वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या परंतु सामुदायिकरित्या वापरासाठी बंद असणार आहेत. इनडोअर खेळ, व्यायाम प्रकार बंद राहतील. परवानगी दिलेल्या बाबींना कोणत्याही परवानगीची गरज नाही. सार्वजनिक खाजगी वाहतुकीसाठी दुचाकीवर 1 स्वार, तीन चाकीवर 1 + 2, चारचाकीमध्ये 1+ 2 यांना परवानगी आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व मार्केट दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीतच सुरू राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा