सोमवार, २३ मार्च, २०२०

कोरोना : पान दुकान उघडे ठेवण्यात आलेल्या 2 प्रकरणी गुन्हा नोंद - सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिनांक 18 मार्च 2020 रोजीच्या आदेशानुसार सर्व पानपट्टी, पानशॉप दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 अन्वये फौजदारी कारवाई होवू शकते याची सर्वांनी नोंद घ्यावी व पुढील आदेशापर्यंत दुकाने बंद ठेवावीत. दिनांक 20 मार्च रोजी पान दुकान उघडे ठेवण्यात आलेल्या २ प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने पोलीसांच्याकडे गुन्हा नोंदविला आहे. अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली.
जिल्हाधिकारी यांच्या दिनांक 22 मार्च 2020 रोजीच्या आदेशाव्दारे अत्यावश्यक सेवा जसे अन्नधान्य, भाजीपाला, फळे, मांसविक्री केंद्रे, किराणा, दूध, औषध दुकाने यांना दुकान उघडे ठेवण्यास परवानगी दिली आहे. इतर अन्य सर्व दुकाने बंद ठेवावयाची आहेत.  अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल. खाद्यगृहे, खानावळ, रेस्टॉरंट व हॉटेल्स यामध्ये ग्राहकांना हॉटेलमध्ये बसवून अन्नपदार्थ देता येणार नाहीत. पण पार्सल देता येईल किंवा घरपोच सेवा देता येईल. हॉटेलमध्ये ग्राहकांना बसवून सेवा देणाऱ्या हॉटेल मालकाविरूध्द कारवाई होवू शकते याची सर्व व्यावसायिकांनी नोंद घ्यावी. जिल्हाधिकारी, सांगली यांनी दिलेल्या आदेशाचे सर्वांनी पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा