सोमवार, १६ मार्च, २०२०

शोले स्टाईल दुचाकीवरून करोनाबाबत जनजागृती सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांचा उपक्रम स्तुत्य - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत शोले स्टाईल दुचाकीवरून सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी सुरू केलेली जनजागृती अत्यंत स्तुत्य असून सर्व नागरिकांनी याला भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी आजपासून आपल्या शोले स्टाईल दुचाकीवरून करोना जनजागृती सुरू केली आहे. आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीत दीपक चव्हाण यांनी आपल्या शोले दुचाकीचा करोना जनजागृती शुभारंभ केला.
या शोले दुचाकीवर गब्बर सिंग, जय, बसंती, बिरू यांच्या प्रतिकृती करोनाबाबत संदेश देत आहेत. याचबरोबर जिल्हा प्रशासनाचा करोनाबाबतचा जनजागृती संदेशही याव्दारे देण्यात आला आहे. दीपक चव्हाण यांनी यापूर्वीही अनेक आपत्ती तसेच शासनाच्या योजनांचे शोलेस्टाईल प्रबोधन आणि जनजागृती केली आहे. आता दीपक चव्हाण यांनी करोना विषाणूपासून जनतेने कसे दूर राहायचे तसेच काय काळजी घ्यावी याबाबतची प्रबोधन आपल्या शोले दुचाकीवरून सुरू केले आहे. दीपक चव्हाण यांचे हे 36 वे प्रबोधन आहे. आज दीपक चव्हाण यांच्या या उपक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी शुभेच्छा दिल्या. आजपासून सांगली शहरात दीपक चव्हाण यांचा करोना जनजागृती शोले स्टाईल रथ प्रबोधन करत फिरणार आहे. विशेष म्हणजे दीपक चव्हाण यांनी चित्रपटाच्या चालीवर करोना प्रबोधन गीतही तयार केले असून ते गीत सोशल मीडियावर लोकप्रिय बनले आहे.
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा