गुरुवार, १९ मार्च, २०२०

खाद्यगृहांनी स्वच्छतेबाबत आवश्यक खबरदारी घ्यावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 लागू केला आहे. या अन्वये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यात खबरदारी घेण्याच्या अनुषंगाने खाद्यगृहांच्या ठिकाणी स्वच्छतेबाबत व घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाय योजना करण्याचे निर्देशित केले आहे.
खाद्यगृहामध्ये उपस्थित होणाऱ्या व्यक्तीस/ग्राहकास हात धुण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी व साबण किंवा सॅनिटायझर इ. उपलब्ध करुन देण्यात यावे, खाद्यगृहाची दैनंदिन स्वच्छता ठेवण्यात यावी, खाद्यगृहामध्ये उपस्थित राहणाऱ्या व्यक्तीस सेवा देताना व्यक्तीमध्ये किमान 3 फूट किंवा 1 मीटरचे अंतर ठेवण्याची सूचना द्यावी, खाद्यगृहात वारंवार वापरल्या जाणाऱ्या वस्तू, (दरवाज्याचे हँडल्स, टेबल, खुर्ची, जिन्यावरील रेलिंग्स, पाण्याचे जार, ग्लास इत्यादी वारंवार स्वच्छ करण्यात यावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळावी, असे निर्देशित केले आहे.
तसेच या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा