शनिवार, २८ मार्च, २०२०

ऊस तोड कामगारांना जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा द्या - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

ऊस तोड कामगार स्थलांतर करू नयेत यासाठी कडक उपाययोजना करा
    
     सांगली (जि.मा.का) 28 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता सांगली जिल्ह्याची स्थलसीमा हद्द प्रवासी व माल वाहतुकीसाठी बंद करण्यात आली असून जिल्ह्यातील साखर कारखान्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊस तोड कामगार राज्या बाहेरून व जिल्ह्या बाहेरून कामासाठी आलेले आहेत. अशा सर्व साखर कारखान्यांनी त्यांच्या निवासाची योग्य ती सोय करून सदर कामगारांना आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा पुरविण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व सहकारी व खाजगी साखर कारखाने यांना दिले आहेत.
     ऊस तोडणी मजूर / कामगार निश्चित केलेल्या ठिकाणावरून अन्य ठिकाणी स्थलांतर / प्रवास करणार नाहीत यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात व सदर बाबतीत कोणत्याही प्रकारची तक्रार होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व सहकारी व खाजगी साखर कारखाने यांना दिले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा