गुरुवार, २६ मार्च, २०२०

कृपया रस्त्यावर येऊ नका; घरीच रहा पालकमंत्री जयंत पाटील यांचे जिल्हावासीयांना कळकळीचे आवाहन

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : इस्लामपूर शहरातील चार कोरोणा बाधित रूग्ण  सापडले होते . त्यांच्याच कुटुंबातील अन्य पाच जण कोरोणा बाधित झाले आहेत. त्यांच्या संपर्कात जे आले अशांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तरीही अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन  जाहीर केला आहे . राज्य सरकारने पूर्वीपासूनच या उपाययोजना सुरू केल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू सुरळीत मिळतील याची सुविधा  विविध ठिकाणी करून देण्यात येत आहे. त्यामुळे पॅनिक होऊ नका. कृपा करून कोणीही रस्त्यावर येऊ नका. कोणत्याही कारणाने कोणतेही वाहन रस्त्यावर येऊ नये. घरातच थांबा. असे आवाहन अत्यंत कळकळीने सर्व जिल्हावासियांना जलसंपदामंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील ९ व्यक्तींना कोरोणाची लागण झाली आहे . हा प्रादुर्भाव रोखला जावा यासाठी इस्लामपूरवासीय तसेच संपूर्ण यंत्रणा अत्यंत खबरदारी घेत आहे. या कुटुंबातील सदस्य ज्यांच्या संपर्कात आले त्या ठिकाणच्या लोकांनाही क्वारंटाइन करण्यात येत आहे. क्वारंटाइन हाच या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे . त्यामुळे कोणीही रस्त्यावर येऊ नका. प्रशासनामार्फत ज्या सूचना दिल्या जात आहेत त्यांचे काटेकोर पालन करा. कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नका . अशी विनंती पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.  आपल्या कुटुंबियांना वेळ द्या.  एकमेकांना समजून घ्या. वाचन करा. घरातच बैठे खेळ खेळा, पण घराबाहेर पडू नका . तसेच बाहेरून कोणी घरात येणार नाही याचीही काळजी घ्या. या काळात लहान मुले, वृद्ध, हृदयविकार, मधुमेह असणारे यांची विशेष काळजी घ्या असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा