शुक्रवार, २७ मार्च, २०२०

सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचे 24 रूग्ण यापैकी एक कोल्हापूर जिल्ह्यातील, सर्वांची प्रकृती स्थीर - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली (जि.मा.का) 27 : सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत 24 जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील एक कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, इस्लामपूर येथील एका परिवारातील 4 व्यक्ती परदेशवारी करून आल्या होत्या. दिनांक 23 मार्च रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. या रूग्णांच्या कुटुंबातील अन्य निकटवर्तियांचा शोध घेण्यात आला. त्यातील लक्षणे असणाऱ्या लक्षणे नसणाऱ्या व्यक्ती यांचे वेळावेळी स्वॅब टेस्टींग घेण्यात आले होते. त्यानुसार परदेशवारी करून आलेल्या 4 व्यक्तींसह 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. या सर्व रूग्णांना मिरज सिव्हील हॉस्पीटल येथील आयसोलेशन कक्षात ॲडमीट केले आहे. या सर्वांची प्रकृती स्थीर आहे. असेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. तसेच ज्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत अशांना इस्लामपूर येथील इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईन कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
कोणीही पॅनिक होऊ नये, हे सर्व रूग्ण ज्यांनी परदेशवारी केली आहे त्या कुटुंबातील त्यांचे निकटवर्तीय आहेत. हे कुटुंब इस्लामपूर शहरात ज्या ठिकाणी रहात आहे तो संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा