बुधवार, १८ मार्च, २०२०

कोरोना : होम क्वॉरंटाईन परिणामकारकपणे राबवा कसूर केल्यास सक्तीने विलगीकरण कक्षात पाठवा - पालकमंत्री जयंत पाटील

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश

सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात 191 प्रवासी परदेश वारी करून आलेले आहेत. यातील 11 प्रवाशांना आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात ठेवण्यात आले होते. आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या सर्व प्रवाशांचे स्वॅब निगेटिव्ह आल्याने त्यांना सोडून देण्यात आले आहे. उर्वरित 180 प्रवाशांना होम क्वॉरंटाईन (घरीच विलगीकरण कक्षात) ठेवण्यात आले आहेे. ज्यांना होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे अशांनी 14 दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण होईपर्यंत अजिबात घराबाहेर पडू नये आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचना तंतोतंत पाळाव्यात. या कालावधीमध्ये घराबाहेर फिरताना आढळल्यास प्रशासनातर्फे सोय करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये सक्तीने ठेवण्यात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी होम क्वॉरंटाईनची अतिशय कडक काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जलसंपदा लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिलेे. ज्यांना होम क्वॉरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशा व्यक्ती घराबाहेरतर पडत नाहीत ना याची आवश्यक तपासणी करण्याचे अधिकार सरकारी यंत्रणेला देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
कोरोना विषाणू (कोविड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यात प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी सहकार कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिक्षीत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी होम क्वॉरंटाईन अत्यंत परिणामकारकपणे होणे आवश्यक असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, यामध्ये असलेले प्रवासी घरी आहेत किंवा नाहीत याची दर दोन तासाने प्रशासकीय यंत्रणेने तपासणी करावी. परदेश वारी करून आलेल्यांची संख्या वाढल्यास आयसोलेशन कक्षात ठेवण्यासाठी वाढीव बेडची तजवीज करावी. या ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा द्याव्यात, असे निर्देश देताना पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. सभा, मेळावे, जत्रा, उरूस, गर्दी जमवणारे अन्य कार्यक्रम यांना 31 मार्च पर्यंत स्थगीती देण्यात आली आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, जनावरांचे आठवडे बाजार हे देखील 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आले आहेत. जनतेनेही सर्व उपाययोजनांसाठी सहकार्य करावे. अनावश्यक धाडस करू नये. कोरोना हा विषय गांभीर्याने घ्यावा. शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालये यांना सुट्‌ट्या देण्यात आल्या असल्या तरी बाहेर फिरायला जावयाचे नियोजन करू नये, घरीच रहावे. वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत. स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. स्वत:मध्ये काही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय तपासणीसाठी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामुग्रीचा आढावा घेतला. उपाययोजनांसाठी जिल्ह्यात कोणताही निधी कमी पडू देणार नाही, असे स्पष्ट करून बैठकीतूनच मुंबई येथील हाफकीन संस्थेस दूरध्वनीव्दारे संपर्क साधून मिरज मेडिकल कॉलेज ने मागणी केलेली 20 व्हेंटीलेटर्स तात्काळ उपलब्ध करून द्या. सद्यस्थिती लक्षात घेता प्रक्रिया कालावधी कमी करा, असे निर्देशित केले. त्यानुसार सदरची व्हेंटीलेटर्स सांगली जिल्ह्याला त्वरीत उपलब्ध करून देण्यात येतील असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
उज्बेकिस्तानमध्ये अडकलेल्या प्रवाशांबरोबर आपण व्हीडिओ कॉन्फरन्सींगव्दारे संपर्क साधला असून हे प्रवासी सुरक्षित आहेत. त्यांना परत आणण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यानांही विनंती  केली असून त्यांनीही परराष्ट्र सचिवांना याबाबत संपर्क साधला आहे. लवकरच हे प्रवासी मायदेशी परत येतील असेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.  
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असणाऱ्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त करून राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सुसज्ज आहे. शासकीय यंत्रणेने स्थानीक पातळीवरही विविध कारणाने होणारी गर्दी टाळण्याबाबत आवाहन करावे. आयसोलेशन वॉर्डमध्ये उत्कृष्ट सुविधा द्याव्यात, आवश्यकता भासल्यास यामध्ये वाढ करण्याची तयारी ठेवावी. असे सांगून प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू रहावे. कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांना साबणाने स्वच्छ हात धुवायला लावावेत. कर्मचाऱ्यांनी स्वत:सह अभ्यागतांचीही काळजी घ्यावी. यावेळी त्यांनी कोरोना विषाणू पसरणार नाही याची काळजी घेणे आपल्या हातात आहे. म्हणून सर्वांनीच आवश्यक खबरदारी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी  जावू नये, वारंवार हात स्वच्छ धुवावेत, काही लक्षणे आढळल्यास स्वत:हून आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सद्यस्थिती विशद केली.
यावेळी कोरोना जनजागृती चित्ररथाचा शुभारंभ पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. या चित्ररथाव्दारे कोरोनाबाबत संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा