शुक्रवार, १३ मार्च, २०२०

करोना : गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात मिशन हॉस्पीटल मिरज येथील बंद असलेल्या इमारतीमध्ये 48 बेडचा क्वारंन्टाईन कक्ष तयार करण्यात आला आहे. याबरोबरच रूग्णांसाठी 6 ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात एकही करोना बाधीत रूग्ण नाही, असे प्रतिपादन करून आपल्या आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
करोना संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सांगली जिल्ह्यात परदेशी प्रवास करून आलेले 73 लोक आहेत. यामधील 6 लोक आयसोलेशनमध्ये होते त्यांची स्वॅब टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज केले आहे. उर्वरित लोकांना घरी क्वारंन्टाईन केलेे आहे. त्यातील 14 लोकांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून त्यांना कोणत्याही प्रकारची करोना संसर्गाची लागण झालेली नाही. उर्वरित लोकांना घरी क्वारंन्टाईन केले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, ज्या लोकांना घरी क्वारंन्टाईन केले आहे अशांना  आरोग्य अधिकारी दररोज त्यांच्या घरी भेट देवून तपासणी करत आहेत त्यांचा पाठपुरावा करत आहेत. करोना विषाणूचा एकाही व्यक्तीस संसर्ग नसल्याने एकही रूग्ण आयसोलेशनमध्ये नाही.
करोनाच्या बाबतीत लोकांमध्ये जनजागृती होणे सर्वात महत्वाचे आहे, असे सांगून ते म्हणाले, ज्या लोकांना ताप, खोकला इत्यादी लक्षणे नाहीत अशा लोकांनी विनाकारण मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. शिंकताना, खोकताना रूमाल ठेवणे आवश्यक आहे. लोकांपासून कमीत कमी 5 फूटाचे अंतर ठेवावे या मूलभूत गोष्टींचे पालन क.रावे. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. यात्रा, जत्रा, आठवडे बाजार, उरूस संयोजकांनी तात्पुरते स्थगीत करावे किंवा पुढे ढकलावेत. अशा प्रकारच्या सूचना राज्य शासनामार्फतही दिल्या आहेत त्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनामार्फत केली जाईल. गर्दीच्या ठिकाणी संक्रमणाची शक्यता बळावते. वयोवृध्द व्यक्ती, लहान मुले, गरोदर स्त्रीया यांना गर्दीच्या ठिकाणी संक्रमण झाल्याचे बाहेरच्या देशामध्ये आढळून आले आहे. यासाठी जनतेने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. स्वत: स्वत:च्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांंतर्गत सर्व विभागांना कोणकोणते काम करावयाचे आहेत याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. सर्व विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या असून त्याप्रमाणे कार्यवाहीही सुरू झालेली आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यात 35 आयसोलेशन बेड तयार ठेवण्यात आले असून आवश्यकतेनुसार ते वाढविले जातील. क्वारंन्टाईनची 150 पर्यंत सुविधा तयार ठेवली आहे. तसेच इतर साधनसामुग्री औषधसाठाही आवश्यक प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य विभाग सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले.
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, सद्यस्थितीत करोनाबाबत अफवा पसरण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता असून अफवांना बळी पडू नका, पॅनिक होऊ नका, सोशल मीडियावरून कोणत्याही प्रकारचे गैरसमज होणारे मेसेज पसरवू नयेत याबाबत ग्रुप ॲडमिननी अधिक दक्षता घ्यावी. अफवा निर्माण करणारे संदेश पसरविल्यास तात्काळ पोलीस यंत्रणेच्या निर्दशनास आणून द्यावे. केंद्र राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोणत्याही प्रकारच्या लोकांची गर्दी जमा करणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मुख्य कार्यकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यात आलेल्या 73 परदेशी प्रवाशांपैकी 29 ग्रामीण भागातील प्रवाशी आहेत. त्यांचे होम क्वारंन्टाईन सुरू आहे. बचतगटांचा मेळावा, दख्खन जत्रा हा मार्च महिन्यात होत असलेला कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या आपत्तीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी 10 टीम्स तयार ठेवण्यात आल्या आहेत. याबरोबरच जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत हात धुण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू असून याव्दारे तसेच माहिती देण्याऱ्या साहित्याव्दारेही जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या या विषयाशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या, रजा रद्द करण्यात आल्या असून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेला प्रशिक्षण देण्यात येत आहे.
महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, जिल्ह्यातील 73 पैकी 57 प्रवाशी महानगरपालिका क्षेत्रातील असून त्यांना होम क्वारंन्टाईन सुरू आहे. त्यांची नियमितपणे तपासणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी आयसोलेशन सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यानांही शास्त्रीय पध्दतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एकांकिका स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, महापौर करंडक पुढे ढकलण्यात आला आहे. हॉटेल्स, थिएटर, मॉल्स, मंगल कार्यालये आदिंना निर्जंतुकीकरणाबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी भारत सरकार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या निर्देशानुसार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा करोना विषयक कामकाजात कार्यरत आहे. सध्या जिल्ह्यात एकही करोना बाधीत रूग्ण नाही. सांगली सिव्हील हॉस्पीटल मिरज शासकीय रूग्णालय येथे विलगीकरण कक्ष सुरू आहे. सांगलीत आजतागायत एकही रूग्ण आयसोलेशन कक्षात दाखल नाही. व्हॉटसॲप, सोशल मीडियातून येणाऱ्या फेक न्युजबाबत कृपया शहानिशा करून घ्या. आवश्यक माहितीसाठी संपर्कासाठी जिल्हा परिषद येथे सुरू करण्यात आलेल्या करोना नियंत्रण कक्षास 0233-2373032 या क्रमांकावर तसेच राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978046, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष 020-26127394, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 104 यावरही संपर्क साधता येईल.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा