गुरुवार, २६ मार्च, २०२०

कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज नागरिकांनी घाबरू नये, धीर सोडू नये - सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम


सांगली, दि. 26, (जि. मा. का.) :  कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीमध्ये घाबरू नका, धीर सोडू नका, संपूर्ण देश, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये काही कडक धोरणे, निर्णय लोकहितासाठी राज्य केंद्र सरकारतर्फे घेण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन जिल्ह्यामध्ये सज्ज आहे, असे प्रतिपादन सहकार कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांच्यासह आरोग्य विभागाचे विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, येणाऱ्या काही दिवसात नागरिकांना नाईलाजाने थोडा त्रास सोसावा लागेल. परंतु हा त्रास आपल्या कामासंदर्भात असेल, मुलांच्या शाळा, कॉलेजच्या संदर्भातील असेल, परंतु अधिक त्रास आपल्या आरोग्याच्या दृष्टीने होऊ नये यासाठी शासनाने काही निर्णय घेतले आहेत. सांगली जिल्ह्यात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. द्राक्ष, फळे, भाजीपाला आदिंच्या बाबतीत अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही वाहतूक सुरळीत चालू राहील याबाबत प्रशासन सर्वोतोपरी काळजी घेत आहे.
 जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंची पुरेसी उपलब्धता आहे. त्यामुळे नागरिकांनी साठा करू नये. त्याचे वाटपही येणाऱ्या काळामध्ये सुरळीत सुरू राहील. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. कलम 144 सुरू असून त्याची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, प्रशासन यंत्रणा सर्वजणच या बिकट परिस्थितीत झोकून देवून काम करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनातर्फे देण्यात येणाऱ्या निर्देशांची पायमल्ली करू नये घराबाहेर पडू नये. मोठ्या संकटाला मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यात 9 रूग्णांना कोरोनाची लागण  झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. या सर्व रूग्णांची प्रकृती स्थीर असून ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नये, घाबरू नये, असे आवाहनही राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी यावेळी केले.
शेतीमालाच्या वाहतूकीत कोणताही अडथळा होऊ नये यासाठी राज्य केंद्र शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच प्रशासनानेही याबाबत अंमलबजावणी सुरू केली आहे. तहसिलदार स्तरावर अशा कृषि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना पासेस देण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासन करत असल्याचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.
राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबईहून आपआपल्या गावाकडे येणाऱ्या लोकांबाबत स्थानिक नागरिकांनी मनात भिती बाळगू नये. ताप, सर्दी, खोकला अशी काही लक्षणे लोकांमध्ये आढळल्यास त्यांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. जिल्हा प्रशासनाने अत्यंत चांगले नियोजन केले आहे. जिल्हा प्रशासन आरोग्य सुविधेच्या दृष्टीने सुसज्ज झाले आहे. येईल त्या परिस्थितीला सामोरे जाऊन सामोपचाराने यातून मार्ग काढावयाचा आहे.
राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, मास्क, सॅनिटायझर, जीवनावश्यक वस्तू यांची जास्त किंमतीने विक्री करू नये. असे कोणी करत असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. खाजगी डॉक्टर्स यांनी त्यांची हॉस्पीटल, दवाखाने लोकांसाठी उघडीच ठेवावी यासाठी राज्य शासनाने कडक धोरण अंवलबिले आहे. त्यामुळे नैतिकतेच्या दृष्टीकोनातूनही खाजगी डॉक्टर्स यांनी आपले दवाखाने लोकांच्या आरोग्य सेवेसाठी सुरूच ठेवले पाहिजेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
भारती हॉस्पीटल कडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक यंत्रणा, मनुष्यबळ, निधी याबाबत सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असा दिलासाही राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी यावेळी दिला.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा