मंगळवार, १७ मार्च, २०२०

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांची कार्यशाळा

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून सद्यस्थितीमध्ये हॉटेल व्यावसायिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत अन्न व औषध प्रशासन, खाद्यपेय विक्रेता मालक संघ व सांगली शहर फास्ट फुड हातगाडी असोसिएशन यांची एकत्रित कार्यशाळा अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
या कार्यशाळेस सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले, अन्न सुरक्षा अधिकारी द. ह. कोळी, एस. व्ही. हिरेमठ व  एस. ए. केदार तसेच खाद्यपेय विक्रेता मालक संघाचे अध्यक्ष लहू भडेकर, उपाध्यक्ष मिलींद खिलारे, रमेश शेट्टी व सांगली शहर फास्ट फुड हातगाडी असोसिएशनचे सुरेश टेंगले, अस्लम शेख उपस्थित होते.
खाद्यपेय विक्रेता मालक संघ यांच्या समवेत दिनांक 16 मार्च रोजी हॉटेल शिवनेरी सांगली व सांगली शहर फास्ट फुड हातगाडी असोसिएशन यांच्या समवेत दिनांक १७ मार्च रोजी आमराई सांगली येथे बैठक घेण्यात आली. या कार्यशाळेत हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहकांनी आत प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे हात साबण, सॅनिटायझरने स्वच्छ धुवून घ्यावेत अशा मजकूराचा बोर्ड ग्राहकांना ठळक दिसेल असा व तसे होत आहे याकडे हॉटेल व्यावसायिकांने जातीने लक्ष द्यावे, हातगाडी / हॉटेल्समधील सर्व टेबल टॉप्स / खुर्च्यांवरील हात ठेवण्याची जागा व दरवाज्यांचे हँडल्स दिवसातून किमान ३ वेळा निर्जंतुकीकरण करावे, हातगाडी / हॉटेल्समधील प्रत्येक कर्मचारी हा निरोगी असेल / राहील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, कच्च्या मालाच्या वापरावेळी उदा. भाजीपाला, गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा, हॉटेल्समधील संगणक / कीबोर्ड/कॅल्क्युलेटर्स प्रतिदिन निर्जंतुकीकरण करून घ्यावेत, हातगाडा विक्री केंद्र / हॉटेल लगतचा परिसर निर्जंतुकीकरण करून घ्यावा अशा सूचना दिल्या. तसेच या सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून नागरिकांच्या हिताची काळजी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा