शनिवार, १४ मार्च, २०२०

करोना : प्रभावी जनजागृती करून सामान्य जनतेचे गैरसमज दूर करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : आजपर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या ग्रामीण 30 व शहरी 47, असे एकूण 77 प्रवासी आरोग्य विभागाच्या निरिक्षणाखाली असून यातील कोणालाही काही लक्षणे उदभवल्यास त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येईल. आरोग्य विभागाने जनजागृतीची मोहिम प्रभावीपणे राबवून करोना आजाराबद्दलचे सामान्य जनतेचे गैरसमज तात्काळ दूर करण्याचा प्रभावी प्रयत्न करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
    जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली करोना आजाराबाबत नियोजन व आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे उपस्थित होते.
    जादा संख्येने एकत्र लोक येणाऱ्या ठिकाणी करोना विषाणूचा संसर्ग जास्त लोकांना होण्याची शक्यता असते म्हणून सभा, समारंभ, संमेलन, शिबीर, कार्यशाळा, मेळावे, यात्रा, जत्रा, उरूस इत्यादी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. आयोजकांनी असे सर्व कार्यक्रम तात्पुरते स्थगीत करण्याबाबतच्या यापूर्वी दिलेल्या सूचना अधोरेखीत करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, परदेश दौरा करून आलेले व ताप, खोकला अशी लक्षण असलेल्या रूग्णांची माहिती ताबडतोब नियंत्रण कक्षाला येईल व अशी कोणतीही व्यक्ती आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणातून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्यांचा गृह अलगीकरण (होम क्वॉरंटाईन) चालू आहे त्या त्या संबंधित क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी प्रवाशावर लक्ष ठेवावे व ते घराबाहेर पडणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
    जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, करोनाबाबत सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची अफवा किंवा एखादी विपर्यस्त पोस्ट पसरवली जात असेल तर करोना नियंत्रण कक्षाने त्याची दखल घेवून पोलीस अधिक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा. मास्क, सॅनिटायझर याची विक्री एम.आर.पी. नेच होत असल्याची खात्री तसेच अप्रमाणित वस्तूंच्या विक्रीला प्रोत्साहन मिळेल असे कोणतेही वर्तन खपवून घेतले जाणार नाही याची कल्पना संबंधित औषध विक्रेत्यांना अन्न औषध प्रशासन विभागाने द्यावी. हॅन्ड वॉशींग व सेल्फ आयसोलेशन (वरचेवर हात धुणे व परदेशातून आल्यास स्वत:च्या घरात 14 दिवस अलीप्त राहणे) हा करोना प्रतिबंधाचा सर्वात सोपा व परिणामकारक उपाय आहे, हे सर्वांना अवगत करावे, अशा सूचना देऊन या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा