बुधवार, ११ मार्च, २०२०

करोना : सांगली जिल्ह्यात आपत्कालीन यंत्रणा सक्रीय - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : आंतरराष्ट्रीय स्तरावर देशांतर्गत करोना विषाणू संसर्ग बाधित रूग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून देशांतर्गत विमान प्रवासाव्दारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे करोना विषाणूचे सांगली जिल्ह्यात संशयित रूग्ण आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर तात्काळ नियंत्रण करणे प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 लागू झाल्याचे घोषित केले आहे. याव्दारे संभाव्य आपत्ती लक्षात घेता पूर्व तयारी प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या अनुषंगाने incident commander म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे (मो.नं. 9822491591) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी (मो.नं. 9766054156) यांना सनियंत्रक म्हणून घोषित केले आहे.
आपत्कालीन काळात विविध विभागांनी दिलेल्या जबाबदाऱ्या सक्षमपणे बिनचूक पार पाडाव्यात असेजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देशित केले असून यामध्ये करोना विषाणूच्या संसर्गाबाबतच्या माहितीसाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394 राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978046 असे असून या धर्तीवर स्वतंत्र जिल्हा नियंत्रण कक्ष मदत केंद्र तात्काळ स्थापन करण्यात यावे 24 तास सुरू ठेवावे, असे निर्देशित करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आरोग्य विभाग, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका, सर्व नगरपालिका यांनी करोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता कृतीप्रमाणित कार्यपध्दती तयार करावी. करोना विषाणू संसर्ग जिल्ह्यात वाढू नये यासाठी उपाययोजना आखाव्यात. याबाबतीत आरोग्य विभागाने तयार केलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे तंतोतंत पालन करून माहिती पुस्तिकेचे वितरण सर्वदूर करावे. स्वतंत्र वैद्यकीय पथके पूर्ण वेळ तैनात ठेवावीत. संशयीत रूग्णांसाठी स्वतंत्र ॲम्बुलन्स व्यवस्था तयार ठेवावी. सदर विषाणूच्या संसर्गाबाबत व्यापक जनजागृती करावी. दैनंदिन प्रगती अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. औषध विक्रेत्यांनी जास्त दराने मास्क विक्री, औषधांची साठेबाजी, संसर्गाबाबत गैरसमज आदि बाबी केल्याचे निदर्शनास आल्यास अन्न औषध प्रशासनामार्फत तात्काळ आवश्यक कारवाई करावी. शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करणे संबंधित प्रवाशांना बंधनकारक असून यामध्ये बाधा निर्माण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरूध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51 नुसार कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. करोना संबंधातील सद्यपरिस्थिती विचारात घेता जिल्ह्यातील विविध रूग्णालये दवाखाने यांनी वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशांची योग्य अंमलबजावणी करावी. अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षित मार्गदर्शन करावे. आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा. गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करावी. क्वारनटाईन आणि आयसोलेशन युनिट स्थापन करावे. नोडल अधिकारी नियुक्त करावेत, अशा सूचना दिल्या आहेत.
गृह विभागाने करोना विषाणू संसर्गाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा, गैरसमज पसरवणाऱ्यांविरूध्द कारवाई करून अफवांवर नियंत्रण ठेवावे. गर्दीच्या ठिकाणी आवश्यक जनजागृती करावी. परदेशी नागरिक अथवा परदेशातून प्रवास करून आलेले भारतीय नागरिक याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला वेळोवेळी सूचना द्याव्यात. गर्दीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत आयोजकांना पटवून द्यावे त्यांना परावृत्त करावे. जिल्हा रूग्णालयाशी समन्वय ठेवावा, असे निर्देशित केले आहे.
महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी तहसिलदार यांनी तालुकास्तरावर सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करावी. आपआपल्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात. कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याबाबत दक्ष रहावे. परदेशी नागरिकांची माहिती संकलित करून जिल्हा रूग्णालयास कळवावी.
अन्न औषध प्रशासन विभागाने सर्व औषध विक्रेते दुकानांची तपासणी करून त्यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करावी. औषध विक्रेते जास्त दराने मास्क विक्री, औषधांची साठेबाजी, संसर्गाबाबत चूकीचे समज पसरविल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ कार्यवाही करावी.
औद्योगिक सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, रेडक्रॉस, लायन्स क्लब, रोटरी क्लब यांच्यासह सर्व सेवाभावी संस्थांनी आपआपल्या स्तरावरून शालेय विद्यार्थ्यांसह सर्व स्तरांवर जनजागृती करावी, असेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देशित केले आहे.
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा