मंगळवार, १७ मार्च, २०२०

कोरोना : रास्त भाव दुकानातून बायोमेट्रिकशिवाय होणार अन्नधान्याचे वितरण - जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे

सांगली, दि. 17, (जि. मा. का.) : अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्त भाव दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्याचे निश्चित केले आहे. ही सुविधा दि. 17 मार्च 2020 पासून उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट / अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नाही त्यामुळे विषाणूचा संसर्ग टाळता येईल. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.
जगभरात पसरत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव त्याच्या संसर्गाने बाधित होणाऱ्या रूग्णाची संख्या लक्षात घेता या विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे प्रतिबंधित उपाययोजना करणे या पार्श्वभूमीवर ही उपाययोजना करण्यात आली आहे. रास्तभाव दुकानदारांनी दुकानामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. याकरिता लाभार्थ्यांना टोकन देऊन नियोजित वेळी दुकानावर येण्याच्या सूचना द्याव्यात. धान्य घेण्यास आलेले लाभार्थी उचित अंतर ठेवून रांगेत उभे राहतील, तसेच धान्यवाटप करताना कोणतीही अनियमितता होणार नाही याची जबाबदारी संबंधित रास्तभाव दुकानदार यांची राहील. कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता सर्व तहसिलदार घेतील, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी स्पष्ट केले आहे.
ही सुविधा दि. 31 मार्च 2020 पर्यंत राहील. दि. 17 मार्च पर्यंत सांगली जिल्ह्यामधील 3 लाख 92 हजार 88 कार्डसंख्येपैकी 3 लाख 24 हजार 975 कार्डधारकांना धान्यवाटप झालेले आहे, म्हणजेच 82.88 टक्के कुटुंबांना मार्च महिन्यात धान्य वाटप पॉस मशीनवरून झालेले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा