गुरुवार, २६ मार्च, २०२०

जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र तात्काळ प्राप्त करून घ्या - उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) :  कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक सेवा वस्तु यांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकउून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक सेवा वस्तू यांना वगळण्यात आले असल्याने अशा प्रकारची वाहतूक करावयाची असल्यास जिल्ह्यातील मालवाहतूक संघटनांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या mh10@mahatranscom.in या ईमेल आयडीवर अर्ज करून वाहतूकीसाठी आवश्यक प्रमाणपत्र तात्काळ प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी केले आहे.
सध्या लागू असलेल्या संचारबंदीमुळे वाहन धारकांना परिवहन कार्यालयात येणे अडचणीचे होत असल्याने तसेच परिवहन कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ईमेलवर अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. याकामी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून नियंत्रण कक्षात मोटार वाहन निरीक्षक मुबारक उचगांवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामी काही अडचण असल्यास नियंत्रण कक्षात 0233-2310555 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच अर्जाचा विहीत नमुना प्राप्त करून घ्यावा. अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जात नमूद केलेल्या वाहनास मेलवर तात्काळ प्रमाणपत्र स्कॅन करून पाठविण्यात येतील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी कळविले आहे.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा