सोमवार, ९ मार्च, २०२०

मिरज रेल्वे स्थानक परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन


- जिल्ह्यात एकूण 5 शिवभोजन केंद्र सुरू
- 8 मार्च पर्यंत 22 हजार 679 थाळीचे वाटप
सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : गरीब गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देणारी शिवभोजन योजना संपूर्ण राज्यामध्ये दिनांक 26 जानेवारी 2020 पासून दुपारी 12 ते 2 या वेळेत कार्यान्वीत झालेली आहे. त्यानुसार दिनांक 26 जानेवारी पासून सांगली शहरामध्ये 3 ठिकाणी दि. 2 मार्च पासून मिरज शहरात एका ठिकाणी ही योजना कार्यान्वीत आहे. पाचवे शिवभोजन केंद्र मिरज रेल्वे स्थानक परिसरात हॉटेल व्यंकटेश्वर येथे दि. 9 मार्च पासून सुरू करण्यात आले. पाचव्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन आमदार सुरेश खाडे यांच्याहस्ते करण्यात आले.
मिरज रेल्वे स्थानक परिसरात सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, मिरज उपविभागीय अधिकारी समिर शिंगटे, तहसिलदार रणजित देसाई, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल, शिवभोजन केंद्र चालक विष्णू बाळरी उपस्थित होते.
राज्यातील गरीब गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने सांगली शहरात सांगली बस स्थानक उपहारगृह, मुख्य हमाल चौक मार्केट यार्ड सांगली सिव्हील हॉस्पीटल परिसर तर मिरज शहरात मिरज ग्रामीण बस स्थानक उपहारगृह या चार ठिकाणी ही योजना कार्यान्वित आहे. दि. 9 मार्च पासून मिरज रेल्वे स्थानक परिसरात 5 वे शिवभोजन केंद्र सुरू झाले आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2020 च्या शासन निर्णयानुसार दिनांक 19 फेब्रुवारी 2020 पासून सांगली मधील शिवभोजन केंद्राच्या थाळी क्षमतेत वाढ करून 150 वरून ती  प्रति केंद्र 200 थाळी झालेली आहे. मिरज शहरात सुरू असलेल्या शिवभोजन केंद्रांची थाळी क्षमता प्रति केंद्र 150 असून या केंद्रांमधून दिनांक 8 मार्च 2020 पर्यंत 22 हजार 679 इतके थाळी वाटप झाले आहे.
ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहाणार आहेत. या भोजनालयांमध्ये बाहेरचे जेवण घेऊन येण्यास भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल. सदरची सवलत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी उक्त आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय नाही. शिवभोजन योजनेस कोणतीही साप्ताहिक सुट्टी नाही. गरीब गरजू व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा