बुधवार, ११ मार्च, २०२०

करोना उपाययोजनांसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : करोना विषाणू संसर्गापासून बचाव करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने वेळोवेळी माहिती देवून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य पर्यायाने सांगली जिल्ह्यामध्ये बाहेरून, परदेशातील प्रवाशांमध्ये करोना कोविड 19 ची लक्षणे आढळून येत असल्यामुळे राज्य जिल्हा प्रथम पायरीवर आहे (only travel related cases). तथापी सर्व पातळ्यांवर यंत्रणांनी योग्य काळजी घेतल्यास पुढे धोका उदभविण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वांनी दक्षता बाळगावी काळजीपूर्वक कामकाज करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करोना विषाणू प्रतिबंधक कार्यवाही नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, करोनाबाबत सद्यस्थिती तसेच जनतेमध्ये घबराट अथवा अफवा पसरू नये याबाबत प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिध्दी द्यावी. जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथे करोना कोविड 19 प्रतिबंधक कक्ष स्थापन करावा. आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे इत्यादी मधून करोना आजाराबाबत माहिती प्रसारीत करण्यासाठी जिंगल्स, हस्तपत्रिका इत्यादी व्दारे तसेच घंटागाडीवरील ध्वनीक्षेपकाव्दारे जनजागृती करावी. उपचाराकरिता येणाऱ्या रूग्णांपैकी करोना सदृष्य लक्षणे आढळल्यास त्वरीत संपर्क साधण्याबाबत खाजगी वैद्यकीय व्यावसायीकांना कळवावे. जिल्ह्यामध्ये येणाऱ्या परदेशी प्रवाशांची हॉटेल, लॉज व्यवस्थापकाकडून माहिती आरोग्य विभागाला देण्यात यावी. चीन, इराण देशातून आलेल्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात दाखल करावे इतर देशातून आलेल्या प्रवाशांना करोना सदृष्य लक्षणे असल्यास विलगीकरण कक्षात दाखल करावे. लक्षण नसतील तर 14 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात यावे.
जिल्ह्यामध्ये 100 ते 150 लोकांना विलगीकृत करण्यासाठी विलगीकरण कक्ष तयार करावेत. तसेच मोठ्या खाजगी धर्मादाय रूग्णांलयांशी संपर्क करून विलगीकरण कक्ष स्थापन करण्याबाबत त्यांना सूचित करावे. जिल्ह्यात व्हेन्टीलेटर्स पीपीई च्या उपलब्धतेसाठी हाफकीन संस्थेक डे मागणी करावी. तसेच ज्या व्हेन्टीलेटर्सची देयके अदा झाली आहेत असे व्हेन्टीलेटर्स उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा. याबरोबरच विलगीकरण कक्षात पीपीई ची प्राधान्याने उपलब्ध अनुदानातून त्वरीत खरेदी करावी. औषध विक्रेत्यांनी करोना आजार प्रतिबंधक मास्क (एन 95, ट्रिपल लेअर) हॅन्ड सॅनिटायजर यांची अयोग्य पध्दतीने प्रसिध्दी विक्री करू नये याकरीता केमिस्ट असोसिएशन यांची आढावा बैठक घेऊन त्यांना सूचित करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
केंद्र शासनाच्या आदेशान्वये आरोग्य यंत्रणेने आपआपल्या कार्यक्षेत्रात ज्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम, मेळावे, शिबीरे या अनुषंगाने एकाचवेळी जास्तीत जास्त लोक जमा होतील असे शासकीय कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत संबंधितांना अवगत करावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, करोना आजाराची व्याप्ती पहाता पूर्व तयारी म्हणून आरोग्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण त्वरीत आयोजित करावे. आपआपल्या कार्यक्षेत्रातील शाळांना भेटी देऊन आरोग्य यंत्रणेने शालेय विद्यार्थ्यांचे हात धुण्याबाबत प्रशिक्षण द्यावे.
करोनाबाबत सर्व पातळ्यांवर यंत्रणांनी आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन समन्वयाने काळजीपूर्वक आणि संवेदनशिलतेने कामकाज करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
या बैठकीत करोना विषाणू प्रतिबंधक कार्यवाही नियोजन आढावा संबंधित सर्व बाबींच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांनी करोना कोविड 19 आजाराची लक्षणे, प्रसार, प्रतिबंध उपचार याबाबत सादरीकरण करून भारतातील सद्यास्थिती, सांगली जिल्ह्यातील सद्यस्थिती भविष्यातील संभाव्य धोका याबाबत माहिती दिली. नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी आभार मानले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा