सोमवार, २३ मार्च, २०२०

कोरोना : खाजगी, कॉर्पोरेट, व्यापारी आस्थापना संपूर्णत: बंद ठेवा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

जीवनावश्यक सेवा व वस्तू पुरविणाऱ्या आस्थापनांना सूट
सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. २३ मार्च २०२० पासून ते दि. ३१ मार्च २०२० रोजीचे रात्री १२ वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यात सर्व खाजगी, कॉर्पोरेट, व्यापारी आस्थापना संपूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र जीवनावश्यक सेवा व वस्तू पुरविणाऱ्या आस्थापना त्यामधून वगळण्यात आल्या आहेत.
या आदेशानुसार बंदी पासून वगळण्यात आलेल्या जीवनावश्यक सेवा व वस्तू पुरविणाऱ्या आस्थापना पुढीलप्रमाणे. अन्न धान्य, भाजीपाला, फळे, मांस विक्री केंद्रे, किराणा, दुध इत्यादी जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या आस्थापना, औषध दुकाने, रूग्णालये, आरोग्य विषयक सेवा पुरविणारी केंद्रे, जीवनावश्यक वस्तू उदा. अन्नधान्य, औषध विषयक, कीड नियंत्रण विषयक, वैद्यकीय उपकरणे इत्यादी उत्पादन, वाहतूक व पुरवठा करणारी साखळी यंत्रणा व या विषयाचा ई-व्यापार आणि जीवनावश्यक अन्नधान्य, किराणा, फळे, मांस केंद्रे इत्यादी साठवणूक करून ठेवलेली वेअर हाऊसेस, पिण्याचे पाणी पुरवठा, सार्वजनिक कचरा व्यवस्थापन व स्वच्छता पुरविणाऱ्या सेवा, बँकिंग आणि आरबीआय मार्फत नियंत्रित होणाऱ्या इतर सेवा व विमा कंपन्या, दूरध्वनी व इंटरनेट सेवा, प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे (मिडीया), विजपुरवठा, इंधन (डीझेल-पेट्रोल), गॅस, उर्जा पुरवठा.
खाद्यगृहे, खानावळ, रेस्टॉरंट व हॉटेल्स यामध्ये In House Dinning (हॉटेल मध्ये ग्राहकांना बसवून सेवा देणे) यावर बंदी लागू करण्यात आली आहे. तथापि घरपोच सेवा, पार्सल व counter services यांना बंदी आदेश लागू राहणार नाही. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजारांना बंदी आदेश लागू राहतील. मात्र सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या मालकीची भाजी मंडई, सांगली जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायती हद्दीतील यांच्या मालकीच्या भाजी मंडई व इतर विनिर्दिष्ठित भाजी मंडई यांनी बंदी आदेश लागू राहणार नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परिवहन बसेस मार्फत होणाऱ्या वाहतूक व्यवस्थेस बंदी करण्यात आली आहे. मात्र महामंडळामार्फतच्या अत्यावश्यक सेवा व वस्तू पुरविणाऱ्या वाहूक व्यवस्थेस सदर बंदी आदेश लागू राहणार नाही. रिक्षा, टॅक्सी (वडाप), खाजगी बसे, मिनी बसेस व इतर कोणत्याही वाहनाव्दारे होणारी व्यावसायिक प्रवासी वाहतुकीस बंदी आदेश लागू राहतील.
सदरचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 43, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, कलम 34 मधील पोटकलम (c) व (m), महाराष्ट्र शासन क्र. करोना 2020.प्र.क्र.58/आरोग्य6 दि. 14 मार्च 2020 नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून  जारी केला आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईन व पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा