बुधवार, ११ मार्च, २०२०

'कोरोना' काळजी नको बचावासाठी खबरदारी घ्या - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

गर्दीच्या कार्यक्रमांचे आयोजन टाळा
सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : जगातील बहूतांश देशामध्ये कोरोना आजाराचे रूग्ण आढळून येत आहेत. या आजाराच्या अनुषंगाने 50 वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, कॅन्सर किडनीेचे आजार इत्यादी लोकांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी वेळोवेळी जेवणापूर्वी नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत. शिंकताना, खोकताना नाक तोंडावर रूमाल धरावा, हस्तांदोलन टाळावे. चेहरा, नाक डोळे यांना वारंवार हाताने स्पर्श करू नये. अर्धवट शिजवलेले तसेच कच्चे मांस खाऊ नये आणि गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
 कोरोना विषाणूची लक्षणे ही श्वसन संस्थेशी निगडीत असून त्यामध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास, निमोनिया, ताप इत्यादी आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने हवेव्दारे त्याचप्रमाणे शिंकणे, खोकणे, हस्तांदोलन इत्यादी कारणांमुळे होतो.  त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन करून कोरोना विषाणू हा आजार संसर्गजन्य असल्याने जिल्ह्यात गर्दीच्या/सार्वजनिक ठिकाणावरील कार्यक्रमाचे (उदा. यात्रा, जत्रा, मेळावे, परिषदासारखे गर्दीचे कार्यक्रम, शाळा / महाविद्यालयातील स्नेहसंमेलन, प्रदर्शने, सण इतर धार्मिक कार्यक्रम, पर्यटन स्थळे सार्वजनिक उत्सव) संबंधित आयोजकांनी आयोजन टाळावे. शासकीय यंत्रणेतील विविध विभागांनीही अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना कोरोना विषाणूच्या आजाराचे गांर्भीय लक्षात आणून देऊन त्यांना गर्दीच्या ठिकाणावरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबतचे महत्व पटवून देऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यापासून परावृत्त करावे, अशा सूचनाही जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा