मंगळवार, १७ मार्च, २०२०

शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये गर्दी टाळा संपर्कासाठी ई-मेल चा वापर करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि.17 (जिमाका) : आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गतही कोरोना या विषाणूचे संसर्ग बाधीत रूग्ण आढळत आहेत. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या क्षणी नागरिकांचे आरोग्य याला सर्वोच्च प्राधान्य असून यासाठी नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शासकीय, निमशासकीय कार्यालयात येणाऱ्या अभ्यांगतांनी 31 मार्च 2020 पर्यंत कृपया गर्दी टाळावी. अभ्यांगतांना शासकीय, निमशासकीय कार्यालयात आवश्यकतेप्रमाणे अतितातडीच्या कामाबाबत अपरिहार्यता असेल तरच कार्यालयात यावे अन्यथा ई-मेल व्दारे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार करण्यासाठी ई-मेल आयडी sanglicollector@gmail.com असा आहे व वेबसाईट www.sangli.nic.in अशी आहे. नागरिकांनी या ई-मेल आयडीवर अर्ज, संबंधित कामे याबाबत संपर्क साधावा. त्यांच्या अर्जांची उचित दखल घेतली जावून अर्ज मार्गी लावण्यात येतील, असा विश्वासही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.
क्षेत्रीय स्तरावरुन अत्यंत तातडीचे टपाल, संदेश हे ई-मेलद्वारे पाठविण्यात यावे. सर्वसामान्य जनतेकडून ई-मेलद्वारे प्राप्त होणाऱ्या अर्जांवर नियमानुसार विहित मुदतीत उचित कार्यवाही करुन अर्जदारांना कळविणे संबंधित शाखा, विभागांची जबाबदारी राहील. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये असणारे कर्मचारी यांनी काम करत असताना कागदपत्र व हस्तांदोलन यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी कार्यालयांमध्ये स्वच्छतेबाबत आवश्यक काळजी घ्यावी. शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी.   
जिल्हास्तरावर, क्षेत्रीयस्तरावर सर्वसामान्य जनतेस शासकीय माहिती अथवा इतर आवश्यक बाबींसाठी अर्जाद्वारे कार्यवाही करावयाची असेल गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्वसमान्य जतनेने शासकीय कार्यालयात न जाता ई-मेलद्वारे अर्ज करावेत  व माहिती प्राप्त करुन घ्यावी. यासाठी संबंधित विभागाने सामान्य जनतेसाठी शासकीय कार्यालयातील ई-मेल आयडी व दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन द्यावेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा