सोमवार, २३ मार्च, २०२०

कोरोना : उद्योग, कारखाने, कंपनी व तत्सम आस्थापना पूर्णपणे बंद ठेवा -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

अत्यावशक वस्तू व सेवा पुरवणाऱ्यांना सूट
सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात अनेक औद्योगिक संस्था, कारखाने, उद्योग धंदे व तत्सम व्यवसाय सुरू आहेत. संबंधित आस्थापनामध्ये सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून तसेच सांगली जिल्ह्याबाहेरून देखील कामगार, कर्मचारी, वाहतूक करणाऱ्या व्यक्ती येत असतात. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. २३ मार्च २०२० पासून ते दि. ३१ मार्च २०२० रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, कंपनी व तत्सम आस्थापना पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
सदरचा आदेश पुढील बाबतीत लागू राहणार नाही – (१) औषध निर्माण करणाऱ्या तसेच वैद्यकीय सेवांकरिता पुरविण्यात येणाऱ्या साहित्यांची निर्मिती करणाऱ्या कंपनी / कारखाने /उद्योग/व्यवसाय. (२) सॅनीटायझर, साबण, जंतूनाशके, हँन्डवॉश निर्माण करणाऱ्या कंपन्या /कारखाने/उद्योग/व्यवसाय. (३) कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनी/ कारखाने / उद्योग /व्यवसाय. (४) अत्यावशक वस्तू व सेवा पुरवणाऱ्या कंपनी / कारखाने / उद्योग /व्यवसाय व सदर चालू असणाऱ्या सेवा देण्यासाठी आयटी व आयटी संबंधित कंपनी. (५) सलग उत्पादन प्रक्रिया चालू असलेल्या कारखान्याचे उत्पादन, हे आदेश निर्गमित झाल्यापासून यथाशिघ्र बंद करावे, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
सदरचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 43, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, कलम 34 मधील पोटकलम (c) व (m), महाराष्ट्र शासन क्र. करोना 2020.प्र.क्र.58/आरोग्य6 दि. 14 मार्च 2020 नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून  जारी केला आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईन व पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा