मंगळवार, ३ मार्च, २०२०

कर्जमुक्तीचे काम व्यवस्थित चाललयं का … काही अडचण तर नाही ना … - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

कसबे डिग्रज, तुंग येथे विविध ठिकाणी भेटी देवून शेतकरी, यंत्रणा यांच्याशी साधला संवाद

सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शासनाने जाहीर केली असून यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या याद्या नुकत्याच प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या आधार प्रमाणिकरणाचे काम गतीने सुरू आहे. जिल्ह्यात या योजनेची सुरू असलेली कार्यवाहीची जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज व तुंग या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून पहाणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे काम व्यवस्थित चालले आहे का ? काही अडचण आहे का ? अशी विचारणा करून स्थिती जाणून घेतली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कसबे डिग्रज येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, युनियन बँक, तुंग येथील आयसीआयसीआय बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी भेट देवून शेतकरी, बँकांचे प्रतिनिधी, यंत्रणांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, तालुका उपनिबंधक आदिनाथ दगडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे क्षेत्रिय अधिकारी नितीन आडमुठे, कसबे डिग्रज विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब म्हासुले, सरपंच किरणकुमार लोंढे, विविध खातेधारक शेतकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये लाभार्थींची यादी लावली आहे का याची पहाणी करून किती खातेधारकांची नावे अपलोड केली, प्रमाणिकरणासाठी प्राप्त झालेली यादी, आत्तापर्यंत झालेले प्रमाणिकरण, प्रमाणिकरण करत असताना येत असणाऱ्या अडचणी यांची इत्यंभूत माहिती घेतली. यावेळी मौजे कसबे डिग्रज येथील विविध कार्यकारी सोसायटी  मार्फत 339 नावे अपलोड करण्यात आली होती, पैकी 295 नावांची यादी प्रमाणिकरणासाठी प्राप्त झाली, आत्तापर्यंत 209 खातेधारकांचे प्रमाणिकरण झाले असल्याची माहिती देण्यात आली. ज्या खाते धारकांना आधार लिंकींग करत असताना अडचणी निर्माण होत आहेत त्यांच्या तक्रारी घेवून तालुकास्तरावरून डेमोग्राफीक कर्न्फमेशन घेऊन त्यांच्या त्रुटी दूर करण्यात येतील असा दिलासाही दिला. राष्ट्रीयकृत बँकांनी खातेधारकांच्या याद्या इंग्रजीत लावल्याचे आढळून आल्यावर शेतकऱ्यांना त्या समजतील का असा प्रश्नही त्यांनी बँक प्रतिनिधींकडे उपस्थित केला. तसेच सर्व आपले सरकार केंद्रावर पात्र खातेधारकांच्या याद्या लावाव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा