मंगळवार, १७ मार्च, २०२०

कोरोना : मास्क नकोच…. वारंवार हात स्वच्छ धुवा - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे

सांगली, दि. 17, (जि. मा. का.) : कोरोना प्रादुर्भाव हे ड्रॉप्लेट इंन्फेक्शन (droplet infection) आहे.  हवेमार्फत होत नाही. खोकल्याद्वारे, शिंकेद्वारे, साधे बोलण्याद्वारे उडणाऱ्या थुंकीच्या, स्त्रावांच्या थेंबामध्ये असलेले विषाणू आजूबाजूच्या वस्तू, डोअर हँडल्स,                               कि बोर्ड्स, टेबल्स, खुर्च्यांची हँड रेस्ट्स, बसेस मधले आधार घेण्यासाठी वापरले जाणारे बार्स इत्यादीवर असू शकतात. त्याला आपला वारंवार स्पर्श होत राहतो. हेच विषाणू आपल्या हातावर येतात व जर याच अस्वच्छ हातांचा स्पर्श आपल्या नाकात, तोंडात, डोळ्याला झाला तर संक्रमणाची प्रक्रिया पूर्ण होते. हे विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात किंवा याच अस्वच्छ हातांनी  आपण जेवण केले, स्नॅक्स खाल्ले तर विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतो व संक्रमणाची प्रक्रिया पूर्ण होते. याला अटकाव करण्यासाठी  यासाठी साबण व स्वच्छ पाण्याने वारंवार हात धुणे हा रामबाण उपाय आहे. मग मास्कचा वापर करुन काय साधणार..? उलट मास्क लावलाय व दिवसभर तो मास्क तोंडावर वर खाली अॅडजस्ट करताना तोंडाला अस्वच्छ हातांचा स्पर्श होत राहील व संक्रमणाचा धोका उलट वाढेल  म्हणून सर्वसामान्यांनी मास्क वापरु नयेत, साबण व स्वच्छ पाण्याने वारंवार हात धुवा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे. 
एन 95 मास्क हा  फक्त आणि फक्त कोरोना आजारावर उपचार करणाऱ्या आयसोलेशन कक्षातील डॉक्टरांनी, नर्सेसनी व हॉस्पीटल कर्मचाऱ्यांनी वापरायचे आहेत. शासकिय कार्यालयातील कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी, खाजगी आस्थापनांतील कर्मचारी यांनी तोंडाला मास्क बांधून फिरु नये. ...फायदा तर काहीच नाही पण समाजात भीती व घबराट पसरते. खोकताना, शिंकताना रूमालाचा वापर करा जेणेकरुन आपली थुंकी इतरत्र उडणार नाही व इतरांना संक्रमण होणार नाही. दोन व्यक्तींमधले संभाषण करताना अंतर साधारण एक मीटर ठेवावे.  रोजच्या रोज स्वच्छ रूमाल वापरा, स्वतःहून गर्दीत जाऊ नका, गर्दी जमवणारे कार्यक्रम घेऊ नका, लग्न समारंभासारखे कार्यक्रम अगदी घरगुती स्वरुपात घ्या,  विनाकारण अनावश्यकरित्या घरसामान, किराणा सामान खरेदी करु नका, अत्यावश्यक सेवा चालू आहेत, राहणार आहेत, असेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी स्पष्ट केले आहे.

000000 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा