शुक्रवार, १३ मार्च, २०२०

खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांनी पदरेश वारी करून आलेल्या रूग्णांची तात्काळ माहिती द्यावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : खाजगी डॉक्टरांकडे परदेश दौरा करून आलेले ताप, खोकला अशी लक्षणे असलेल्या रूग्णांची माहिती ताबडतोब करोना नियंत्रण कक्षाला शासकीय आरोग्य यंत्रणेला देण्यात यावी. याबरोबरच शेजारील कर्नाटक राज्यातील आलेल्या रूग्णांची माहिती देखील देण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
करोना संबंधित माहितीच्या देवाणघेवाणीसाठी आवश्यक निर्देशांसाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयएमए सांगली मिरज, केमिस्ट असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, टूर्स ट्रॅव्हल्स कंपन्या यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे आदि उपस्थित होते.
 यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आयएमए ने करोना बाबत आपल्या स्तरावर प्रबोधन जनजागृती करावी असे आवाहन करून वयस्कर, गरोदर माता लहान मुले यांच्यावर उपचार करताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन केले.
यावेळी मास्क, सॅनिटायझर यांची विक्री एमआरपी दरानेच करावी तसेच सदर वस्तूंच्या विक्रीला प्रोत्साहन मिळेल असे वर्तन करू नये, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी औषध दुकानात परदेशी वारी करून आलेल्या व्यक्तीला ताप, खोकला अशी लक्षणे असतील तर त्याची माहिती तात्काळ करोना नियंत्रण कक्षाला द्यावी. करोना आजारावर मान्यताप्राप्त नसलेल्या औषधांची विक्री स्वत:च्या स्तरावर करण्यात येवू नये, असे निर्देश केमिस्ट असोसिएशन पदाधिकाऱ्यांना दिले.
हॉटेल लॉजमध्ये उतरणाऱ्या परदेशी प्रवाशी किंवा परदेश वारी करून आलेल्या प्रवाशांची माहिती लिखीत स्वरूपात घ्यावी ती जिल्हा नियंत्रण कक्षाला कळवावी, असे निर्देश हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
टूर्स ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नवीन सहलींची बुकिंग स्थगीत करावी तसेच जे टूर्स यापूर्वी परदेशात गेले आहेत असे प्रवाशी पुनश्च: आपल्या जिल्ह्यात आल्यानंतर सदर प्रवाशांची माहिती तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सक तथा करोना नोडल अधिकारी मो. नं. 9822491591 किंवा करोना नियंत्रण कक्ष जिल्हा परिषद सांगली 0233-2373032 या क्रमांकावर द्यावी, असे निर्देशित करण्यात आले.
000000







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा